Akhilesh Yadav News: इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला आहे. भाजपा सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे गोडाऊन बनले आहे. केवळ भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत नाहीत, तर भ्रष्टाचारी लोकांनी जो पैसा कमावला आहे, तोही घेत आहेत. डबल इंजिन सरकारचा दावा करणारे आता होर्डिंग्सवर फक्त एकाचाच फोटो लावत आहेत, या शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी टीकास्त्र सोडले. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. त्यांनी दिलेली आश्वासने खोटी आहेत. भाजपाने सांगितले होते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तरुणांना रोजगार मिळेल. विकासाची अनेक स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र, नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाने दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे
इंडिया आघाडी ही निवडणुकीतील नवीन आशा आहे. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे गरिबी हटवता येऊ शकेल. ज्या दिवशी देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळू लागेल, त्या दिवशी शेतकरी सुखी होतील. इंडिया आघाडीतील घटक पक्ष सांगत आहेत की, आम्ही एमएसपीची गॅरंटी देऊ. ज्या दिवशी भारत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल, त्या दिवसापासून देशातील गरिबी दूर व्हायला सुरुवात होईल. जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सामाजिक न्यायाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.
दरम्यान, ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपा संविधान संपवणार आहे. संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसचे १५-२० दिवसांपूर्वी मला वाटत होते की, भाजपा १८० जागा जिंकेल. परंतु आता १५० जागा भाजपाला मिळतील असे वाटते. आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होते, असा रिपोर्ट मिळत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.