नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीला आज ४४ वर्षे पूर्ण झालीत. याचे निमित्त साधून समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. देशावर त्यावेळी लादलेली आणीबाणी त्रासदायकच होती. परंतु, सध्याच्या स्थितीपेक्षा चांगली होती, अस आजम खान म्हणाले. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच समर्थन करताना ममता यांनी म्हटल्यापेक्षा देशातील स्थिती गंभीर असल्याचे म्हटले.
आजम खान म्हणाले की, ममता बॅनर्जी जे सांगत आहेत, त्यापेक्षाही स्थिती बिकट आहे. ममता यांनी फार कमी सहन केलं आहे. स्थिती फारच खराब आहे. ममता केवळ आपल्या राज्याविषयी बोलत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला अनेक राज्यातील त्रासाबद्दल सांगत आहोत.
भाजपने मोठ्या प्रमाणात हिंसक कामे केली आहेत. त्यामुळे अशांती निर्माण झाली. परंतु, त्यासाठी कोणत्याही एका पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही. भारत स्वातंत्र झाल्यापासूनच्या ७० वर्षांचा कालावधी मुस्लिमांसाठी फारच हिंसक होता, असा दावा आझम खान यांनी केला. सरकारमधील नेते म्हणतात की, वंदे मातरम म्हणण्यास नकार देणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. यामुळे आणीबाणी त्रासदायक होतीच, परंतु आताच्या स्थितीपेक्षा चांगली होती, असं आपण मानतो, असंही आझम खान यांनी सांगितले.