मीना कमल / लखनौसमाजवादी पक्षात समझोता शक्यच नाही, असे आता जवळपास स्पष्टच झाले आहे. पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतरही अखिलेश यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. त्यातच मुलायमसिंग यांनी आपले चुलत बंधू राम गोपाल यादव यांच्यावर गुरुवारी टीकास्त्र सोडल्याने वाद अधिकच चिघळला आहे.राम गोपाल हे अखिलेश गटात आहेत. त्यांच्यामुळेच पक्षात समस्या निर्माण ्रझाल्या, असे सांगतानाच, मुलायमसिंग यांनी पुन्हा अखिलेशच मुख्यमंत्री होतील, असे विधान केले. पण जोपर्यंत राम गोपाल यांना पूर्वीची पदे दिली जात नाहीत, त्यांना पक्षात घेतले जात नाही, अमरसिंग यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला जात नाही, शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर केले जात नाही आणि आपल्याला उमेदवार निवडीचे अधिकार दिले जात नाहीत, तोपर्यंत मुलायमसिंग यांच्याशी समझोता अशक्य आहे, असे अखिलश यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितले आहे. तसेच निवडणुका होईपर्यंत, म्हणजे पुढील तीन महिने आपणच समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी राहू, अशीही त्यांची भूमिका आहे. यापैकी कोणतीही अट मुलायमसिंग यांना मान्य नाही.समझोता झाला नाही आणि निवडणूक आयोगाने सायकल हे निवडणूक चिन्ह वा ते अखिलेश गटाला मिळाले, तर मोटारसायकल हे चिन्ह आपणास मिळावे, असा अर्ज मुलायमसिंग गटातर्फे करण्यात आला आहे. अखिलेश गटाचे सायकलसाठीच प्रयत्न सुरू असून, ते न मिळाल्यास माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता पार्टीचे झाड हे निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी ते प्रयत्न करतील. मुलायमसिंग यांनीही चरणसिंग यांच्या पक्षाचे बैलांसह शेत नांगरणारा शेतकरी हे चिन्ह मिळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. समाजवादी जनता पार्टीच्या कमल मोरारका यांच्याशी अखिलेश गट तर लोकदलाच्या चिन्हासाठी सुनील सिंग यांच्याशी मुलायम गट चर्चा करीत असल्याचे समजते.निवडणूक आयोगा दोन्ही गटांची बाजू १३ जानेवारी रोजी ऐकून घेणार असून, १७ जानेवारीपूर्वी अधिकृत समाजवादी पक्ष कोण हे ठरवेल. तोपर्यंत चर्चा, समझोत्याचे प्रयत्न सुरूच राहतील. मात्र त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता कमीच आहे.
समाजवादी पक्षात समझोता अशक्यच
By admin | Published: January 12, 2017 1:11 AM