लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच इलेक्ट्रॉनिक ब्रँडचा मुद्दा देशभर गाजत होता. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपाला कोंडीत पकडण्यात व्यस्त आहेत. पण आता गुगल ॲड्सचा मुद्दा वरचढ होऊ लागला आहे. भाजपाने गुगलच्या माध्यमातून प्रचारासाठी आपल्या जाहिराती दिल्या असून पक्षाने जवळपास 100 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्याचा दावा केला जात आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
अखिलेश यादव यांनी पोस्ट करून म्हटलं की, "भाजपने गुगल ॲड्सवर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला आहे. वास्तविक हा जनतेचा पैसा आहे, जो एकीकडे भ्रष्ट भाजपाने निवडणुकीच्या देणग्या स्वरूपात कंपन्यांकडून गोळा केला आहे आणि कंपन्यांनी जनतेकडून नफा गोळा केला आहे आणि दुसरीकडे कोरोनाच्या काळात भाजपाने थेट जनतेकडूनही पैसे गोळा केले आहेत. हे फक्त जनतेच्या पैशाशीच नाही तर जनतेच्या भावनांशीही खेळत आहे."
"भाजपाला वाटतं की निवडणुका मतांनी जिंकल्या जात नाहीत तर नोटांनी जिंकल्या जातात. यावेळी जनतेने चारही टप्प्यात भाजपाचा पराभव करून सर्व संभ्रम दूर केला असून सातव्या टप्प्यापर्यंत भाजपाचं नाव घेणारा कोणीही उरणार नाही. मतांच्या नावावर भाजपाचे दिवाळे निघाले आहेत" असंही अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
या निवडणुकीत डिजिटल माध्यमातून प्रचार करण्यावर जास्त भर दिला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपाने या प्रसिद्धीसाठी जवळपास 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा पैसा केवळ जाहिरातींसाठी गुगलवर खर्च करण्यात आला आहे.
भाजपाशिवाय काँग्रेसने सुमारे 45 कोटी रुपये, डीएमकेने 40 कोटी रुपये, वायएसआरसीपीने 10 कोटी रुपये आणि टीएमसीने पाच कोटी रुपये गुगल जाहिरातींवर खर्च केले आहेत. याशिवाय TDP आणि BJD ने जाहिरातींवर पैसे खर्च केले आहेत.