मैनपुरी येथील समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव या आपल्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने सक्रिय आहेत. याच दरम्यान अखिलेश यादव यांची परदेशात शिकत असलेली मुलगी आदितीही आई डिंपल यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. डिंपल यादव यांना जेव्हा मुलगी राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.
डिंपल यादव यांना विचारण्यात आलं की, तुमची मुलगीही तुमच्यासोबत निवडणूक प्रचारात दिसत आहे, तर मुलायम सिंह यादव यांची पुढची पिढी राजकारणात येण्यासाठी तयार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ते खरं आहे का? याबाबत डिंपल यादव म्हणाल्या की, मला वाटतं प्रत्येकाने आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव घेतले पाहिजेत. मुलं सुट्टीत घरी आलीत तर निवडणुकीचा कसा उत्साह आहे हे त्यांनी पाहावं म्हणूनच अदिती माझ्यासोबत येते.
गेल्या सोमवारी कुसमरा येथे आयोजित कार्यक्रमात डिंपल यादव जाहीर सभेला संबोधित करत होत्या. त्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत मुलगी आदितीही उपस्थित होती. महिला कार्यकर्त्यांमध्ये आदिती बसली होती. तिची आई डिंपल स्टेजवरून भाषण देत होती, तेव्हा आदिती ते भाषण लक्षपूर्वक ऐकत होती आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.
राहुल गांधींच्या 'शक्तीच्या विरोधात' या विधानावर डिंपल यादव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, हे सर्व राजकारण आहे. आज देशातील महिलांची स्थिती काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. महिलांवर सातत्याने अन्याय होत आहेत, खून होत आहेत. उत्तर प्रदेशात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 50 टक्के वाढ होत आहे. यावरून सरकार या मुद्द्यांवरून कसं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे, हे दिसून येतं.