नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. तसेच, या पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली. यानंतर आज समाजवादी पार्टीने आपल्या सहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव मैनपुरी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. याशिवाय, मुलायम सिंह यादव यांचा पुतण्या धर्मेंद्र यादव बदायूं मतदार संधातून नशीब आजमावणार आहेत. तसेच, या उमेदवारांच्या यादीत अक्षय यादव, कमलेश कठेरिया, शब्बीर बाल्मिकी आणि भाईलाल कोल यांना उमेदावरी देण्यात आली आहे.
काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राहुल गांधी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या 15 उमेदवारांच्या यादीत गुजरातच्या चार आणि उत्तर प्रदेशच्या 11 जागांचा समावेश आहे. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून निवडणूक लढवणार आहेत.