"ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 03:40 PM2024-04-17T15:40:24+5:302024-04-17T15:48:44+5:30
राहुल आणि अखिलेश यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल आणि अखिलेश यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या पक्षांनी 2017 ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती, त्यावेळी त्यांची स्थिती चांगली होती, पण आज दोन्ही पक्ष आयसीयूमध्ये आहेत.
केशव केशव प्रसाद मौर्य पुढे म्हणाले की, जनता सपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ऑक्सिजन द्यायला तयार नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतील त्यांची विधानं निराधार आहेत. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे सर्वांनीच स्पष्ट केले आहे. यावेळी केशव मौर्य यांनीही लोकांनी पीएम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने गुरुवारी गाझियाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. राहुल यांनी 15-20 दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की भाजपा 180 जागा जिंकेल, परंतु आता मला वाटते की त्यांना 150 जागा मिळतील. आम्हाला प्रत्येक राज्यातून रिपोर्ट मिळत आहेत की इंडिया ब्लॉक मजबूत होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आमची आघाडी खूप मजबूत आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू असं म्हटलं आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, यूपीचे लोक आमचं चांगलं स्वागत करतात. यावेळी पाठवणीही अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. इंडिया आघाडी ही नवी आशा आहे. आपल्या जाहीरनाम्यात गरिबी हटवण्याचे व्हिजन सांगितले आहे. इंडिया आघाडी MSP ची गॅरंटी देण्याचं आश्वासन देत आहेत. पण ज्या दिवशी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल, त्याच दिवशी गरिबी कमी होण्यास सुरुवात होईल.