नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातकाँग्रेसच्या साथीनं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या समाजवादी पक्षानं काँग्रेसप्रणित महाआघाडीत न जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हातात हात घालून प्रचार करताना दिसलेल्या अखिलेश यादव यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. प्रादेशिक पक्षांनी एकत्रित येऊन तिसरी आघाडी करण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न आहे. भाजपा आणि काँग्रेससोबत न जाता तिसरी आघाडी तयार करण्याच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संकल्पनेचं अखिलेश यादव यांनी समर्थन केलं आहे. मी स्वत: राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षानं काँग्रेसला पाठिंबा दिला. मात्र त्यांच्या आमदाराला मंत्रीपद देण्यात आलं नाही. त्याबद्दल अखिलेश यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसनं समाजवाद्यांचा रस्ता मोकळा केला असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपावाले आम्हाला मागासलेले समजतात. याबद्दल त्यांचेही आभार मानतो, असंदेखील ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून देशात महाआघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहे, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं. 'प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची संकल्पना चांगली आहे. राव यांच्या या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे,' असं यादव म्हणाले. भाजपा जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागते. निवडणुकीच्या आधी त्यांना समाजवादी मागास वाटत होते. त्यामुळे आम्ही त्यांना धन्यवाद देतो, असा तिरकस निशाणा त्यांनी साधला.
राहुल गांधींचा मित्र करणार काँग्रेसशी दोन हात, महाआघाडीला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 5:36 PM