नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यातच, समाजवादी पार्टीचे महासचिव राम गोपाल यादव यांनी वादग्रस्त विधान केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ला हा कट असून, मतांसाठी हा हल्ला घडवण्यात आला, असे खळबळजनक विधान यादव यांनी एका कार्यक्रमात केले आहे.
निमलष्करी दल सरकारवर नाराज आहे. मतांसाठी जवानांना मारण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये चेकिंग नव्हती. साधारण बसेसमधून जवानांना पाठवण्यात आले. हे एक षड्यंत्र होते. आता काही सांगू शकत नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर याची चौकशी होईल आणि मोठे-मोठे लोक यात अडकतील, असे राम गोपाल यादव यांनी सांगितले. दरम्यान, राम गोपाळ यादव यांचे पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरील विधान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीला महागात पडू शकते.
याआधी जम्मू-काश्मीरमधील पुलावामा दहशतवादी हल्ला हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केला होता. ते म्हणाले होते, 'पुलवामा हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात फिक्सिंग आहे. हा हल्ला हातमिळवणी शिवाय शक्य नाही. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा द्यायला पाहिजे.'
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले होते.