Bihar Political Crisis: बिहारचे मुख्यमंत्री 'इंडिया' आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बिहारमध्ये राजकीय उलथापथ सुरू असून नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. बिहारमधील राजकीय गोंधळाबाबत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनी एक मोठे विधान केले. "नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत राहिल्यास त्याचा त्यांना मोठा फायदा होईल, ते पंतप्रधान पदाचा चेहरा असतील. बिहारमध्ये जे काही सुरू आहे, ते मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळत आहे", असे त्यांनी सांगितले.
डिंपल यादव म्हणाल्या की, मुख्यमंत्री नितीश कुमार सोबत राहिले तर इंडिया आघाडी खूप मजबूत होईल. सध्याचे सरकार संविधानाच्या विरोधात काम करत असून तरुणांना नाराज करत आहे. सरकारने सर्व माता भगिनींना निराश केले. शेतकऱ्यांवर अन्याय केला.
तसेच डिंपल यादव यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या काँग्रेससोबत ११ जागांवर करार करण्याबाबत केलेल्या पोस्टवर देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात भाजपाच्या समोर भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे आणि इंडिया आघाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी सपा घेईल. आमच्या पक्षाचेही नुकसान होता कामा नये. जिंकणाऱ्या जागांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. त्यामुळे मला वाटते की, जागांचा प्रश्न नाही कारण कोण जिंकू शकतो, हा खरा प्रश्न आहे. भाजपाला कोण हरवू शकते, याकडे पक्षाचे लक्ष आहे.
बिहारमध्ये राजकीय उलथापालथमागील काही दिवसांपासून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार यांनी पलटी घेताच बिहारमधील आरजेडी आणि जदयूचे सरकार कोसळेल, ज्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. महाआघाडीत लालू यादव यांचा राजद, नितीश कुमार यांचा जदयू, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे. जेव्हा भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हा नितीश कुमार यांनी लगेचच पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. कर्पुरी यांना भारतरत्न मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गावी पोहचून नितीश यांनी कर्पुरी यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांच्याबद्दल भाष्य केले. तसेच कर्पुरी यांनी कधीच आपल्या मुलाला पुढे आणले नाही. पण आता लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत आहेत, असे विधान त्यांनी केले. नितीश यांचा हा टोमणा लालू यादवांना असल्याचे बोलले जाते.