केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. विरोधक या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल करत आहेत आणि राज्यांशी भेदभाव केल्याचा आरोप देखील करत आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांनी बुधवारीही निदर्शनं केली. याच दरम्यान सपा खासदार जया बच्चन यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
जया बच्चन यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना आपला संताप व्यक्त केला आहे. "हे फक्त नाटक आहे, रोजगार कसे निर्माण करणार? त्यांनी राज्यांचीही दिशाभूल केली आहे. बिहारचीही दिशाभूल केली आहे" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही. प्रतिक्रिया द्यावी असा हा अर्थसंकल्प नाही. हे फक्त नाटक आहे. आश्वासनं कागदावरच राहतील आणि त्यांची अंमलबजावणी होणार नाही" असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.
"आम्हाला फक्त वाटतं की त्यांनी (केंद्राने) खरं बोलावं आणि देशातील तरुणांची दिशाभूल करू नये. ते रोजगार कसे निर्माण करणार आहेत? त्यांनी राज्यांनाही काही दिलं नाही, दिशाभूल केली आहे. बिहारचीही दिशाभूल केली आहे. काय दिलंय बिहारला?... बिहारचे लोक खूप आनंदी होत आहेत" असं देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना जया बच्चन यांनी म्हटलं.
इंडिया आघाडीमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या खासदारांनी अर्थसंकल्पात विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांवर भेदभाव आणि अन्याय केल्याचा आरोप केला आणि त्याविरोधात संसद भवन परिसरात निदर्शनं केली. या आंदोलनात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, अखिलेश यादव आणि इतर अनेक विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.