नवी दिल्ली - मुलीचं लग्नासाठीचं किमान वय वाढवण्याशी संबंधित एका विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दलचे संकेत दिले होते. मुलींचं लग्नाचं किमान वय सध्या 18 वर्ष आहे. ते वाढवून 21 करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठीची तयारी सरकारनं सुरुवात केली आहे. याबद्दलचं विधेयक याच अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदाराने यावर एक वादग्रस्त विधान केलं आहे. "मुली 16 व्या वर्षी आई बनू शकतात, तेच त्यांचं लग्नाचं वय असावं" असं म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन (MP ST Hasan) यांनी "मला वाटतं की, जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न 16 व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही" असं म्हटलं आहे. तसेच "जर मुलगी 18 व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 16-17 करण्यात यावे. लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ (पोर्नोग्राफी) पाहत बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं" असं देखील एसटी हसन यांनी म्हटलं आहे.
"लग्न लवकर झालं तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात"
सपा खासदार एसटी हसन यांनी "जर लग्न लवकर झालं तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात, कारण प्रजननक्षमतेचे (फर्टिलिटी) वय 15 ते 30 वर्षे आहे. अशा स्थितीत लग्नाचे वय वाढवू नये" असं म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान वर्क यांनी या प्रस्तावाबाबत आक्षेपार्ह विधान केलं आणि लग्नाचे वय वाढवल्याने मुली आणखी बिघडतील, असं त्यांनी म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लग्नाचं किमान वय वाढवण्यासाठी बाल विवाह कायद्यात सुधारणा केली जाईल. या कायद्यात सध्या मुलींचं लग्नासाठी किमान वय 18 वर्षे आहे. कायद्यात बदल करण्यासाठी सुधारणा विधेयकाला बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
मुलींच्या लग्नासाठीच्या किमान वयाबद्दल निर्णय घेण्यासाठी गेल्या वर्षी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. त्या टास्क फोर्सनं लग्नासाठीचं किमान वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याचा सल्ला दिला होता. माजी खासदार जया जेटलींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी भाषणात लग्नासाठीचं किमान वय वाढवण्याबद्दल संकेत दिले होते. सध्याची परिस्थिती पाहता लग्नाचं वय वाढवण्यासंदर्भात विचार व्हायला हवा, असं मोदी म्हणाले होते.