Akhilesh Yadav on CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर हल्ला चढवला होता. उर्दू भाषेपासून महाकुंभावर केलेल्या खोट्या प्रचारापर्यंत मुख्यमंत्री योगींनी समाजवादी पक्षावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भगवे कपडे घातल्याने कोणी योगी बनतो का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींवर निशाणा साधला.
अखिलेश यादव यांनी कन्नौजच्या दौऱ्यावर भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. अर्थसंकल्पावरुन भाजपला धारेवर धरताना हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नसल्याचे अखिलेश यादव म्हणाले. सरकार खते, बी-बियाणे, कीटकनाशके वेळेवर पुरवू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत सामना करावा लागतोय असा दावा अखिलेश यादव यांनी केला.
महाकुंभाच्या निकृष्ट नियोजनाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. महाकुंभाची वेळ वाढवण्यात यावी जेणेकरून ज्यांना आजपर्यंत स्नान करता आले नाही त्यांना संधी मिळू शकेल. भाजपचे हे असे सरकार आहे ज्यामध्ये इंजिन आणि डब्बे एकमेकांना धडकत आहेत, असं अखिलेश यादव म्हणाले.
यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र डागलं. "भगवे कपडे घालून योगी होत नाही. भारतातील लोकांना रामायण चांगलेच माहिती आहे. रावणही माता सीतेचे अपहरण करण्यासाठी ऋषीच्या वेशात आला होता, हेसुद्धा लोकांना माहिती आहे. संपूर्ण देश आणि राज्याला माहिती आहे. हे सर्व सनातनी लोकांनाही माहीत आहे. हिंदू समाजातील लोकांना माहीत आहे. म्हणून आपण आणि आपण सर्वांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे," असंही अखिलेश यादव म्हणाले.
"अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे, ज्यांचे वागणे आणि भाषा अत्यंत वाईट आहे. अलोकतांत्रिक भाषा बोलत आहे. समाजवाद्यांना समाजवादाचे काहीच कळत नाही, असे म्हटलं जात आहे. समाजवादी म्हणजे सर्वांना साथ देणे, समाजवादी म्हणजे सर्वांचा आदर करणे, समाजवादी म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालणे. पण आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीच कळत नाही. कोणतीही माहिती नसलेले हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांना लोकशाहीबद्दल विचाराल तर त्यांना त्याचा अर्थही कळत नाही," असाही टोला अखिलेश यादव यांनी लगावला.