ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षामध्ये मोठया प्रमाणावर 'यादवी' सुरु आहे. गृहकलह अधिक तीव्र झाला असून, आज लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात होत असलेल्या बैठकीआधी या यादवीची झलक दिसून आली.
सपा मुख्यालयाबाहेर जमलेले मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांचे समर्थक परस्परांना भिडले. पक्षांतर्गत ज्या घडामोडी सुरु आहेत त्या पार्श्वभूमीवर सपाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव मोठा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समाजवादी पक्षातील फूट टाळण्यासाठी मुलायमसिंह अखिलेश यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवून स्वत: मुख्यमंत्रिपद हाती घेतील, अशी शक्यता आहे. दरम्यान मुलायम सिंह यादव यांनी खासदार, आमदार, विधान परिषदेचे आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असून मंत्रीमंडळातून निलंबित झालेले शिवपाल यादव यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. ज्या अमरसिंह यांच्या नावावरुन हा वाद विकोपाला गेला आहे त्यांना मात्र या बैठकीत बोलावण्यात आलेले नाही. दरम्यान लखनऊमधील सपा मुख्यालयाकडे जाण्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
घटनाक्रम
- अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यामध्ये आधीपासून कुरघोडीचे राजकारण सुरु होते. शिवपाल यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला.
- शिवपाल यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अखिलेश समर्थकांना डावलण्यास सुरुवात केली.
- अखिलेश यादव यांनी तडकाफडकी रविवारी शिवपाल यादव आणि त्यांच्या चार समर्थक मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी केली त्यानंतर शिवपाल यांनी मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली.
- मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा दुस-यांदा अखिलेश यांना पसंती दिल्यानंतर हा वाद उफाळून आला.
- अखिलेश यादव यांच्या विरोधात जे कारस्थान रचण्यात आले आहे, त्यामागे मुलायमसिंह यादव यांची दुसरी पत्नी आहे, शिवपाल फक्त या कारस्थानाचा चेहरा आहेत असा अखिलेश समर्थकांचा आरोप आहे.
#WATCH Clash between Akhilesh Yadav supporters & Shivpal Yadav supporters outside SP office in Lucknow. pic.twitter.com/TuMtvxtL5C— ANI UP (@ANINewsUP) October 24, 2016