ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 3 - अंतर्गत यादवीमुळे फुटीच्या उंबरठयावर पोहोचलेला समाजवादी पक्ष एकसंध रहावा यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव या पिता-पुत्रांमध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेली दंगल मिटण्याचे संकेत मिळाले आहेत. दोघांनी एक-एक पाऊल मागे येत समेटाची तयारी दर्शवली आहे.
अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यामध्ये आज तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. बैठकीत नेमके काय ठरले त्याची माहिती अधिकृतपणे समोर आली नसली तरी, मुलायम पक्षाच्या संस्थापक अध्यक्षपदावर असतील तर अखिलेश राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहतील.
ठरलेल्या तडजोडीच्या फॉर्म्युल्यानुसार मुलायम आणि अखिलेश पुन्हा तिकीट वाटप करतील. पुन्हा तिकीट वाटपाला मुलायम तयार असल्याची समाजवादी पक्षातील सूत्रांनी माहिती दिली. अखिलेश आणि मुलायम दोन्ही गटांनी पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह सायकलवर दावा सांगितला आहे. दोघांनी निवडणूक चिन्हासाठी आपआपली बाजू निवडणूक आयोगाकडे मांडली आहे.
90 टक्के आमदारांचा अखिलेश यादव यांना पाठिंबा
90 टक्के आमदारांचा अखिलेश यादव यांना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा समाजवादी पक्ष म्हणून विचार करण्यात यावा असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितल्याचे राम गोपाल यादव यांनी सांगितले. राम गोपाल अखिलेश यांचे काका असून, सपामध्ये यादवी सुरु झाल्यापासून ते अखिलेश यांच्यासोबत आहेत.