नवी दिल्ली - बिहारच्या समस्तीपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी रुग्णालयात सुरू असलेल्या धक्कादायक गोष्टींची पोलखोल झाली आहे. एका वृद्ध जोडप्याकडे आपल्या मुलाचा मृतदेह सरकारी रुग्णालयातून नेण्यासाठी पैसे मागितल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या मुलाचा मृतदेह देण्यासाठी 50 हजार रुपये मागितल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे. दाम्पत्याकडे एवढे पैसे नसल्याने ते ते जमा करण्यासाठी त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे,
वृद्ध दाम्पत्य मुलासाठी भीक मागत शहरात फिरत आहेत. याच दरम्यान, या जोडप्याचा भीक मागतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला मृताचे वडील महेश ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. "काही दिवसांपूर्वी माझा मुलगा बेपत्ता झाला होता. यानंतर, आमच्या मुलाचा मृतदेह समस्तीपूर येथील सदर हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोन आला. आता, माझ्या मुलाचा मृतदेह सोडण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आमच्याकडे 50 हजार रुपये मागत आहे. आम्ही गरीब आहोत, इतकी मोठी रक्कम आम्ही कशी भरणार?" असं म्हटलं आहे.
"मुलाचा मृतदेह मिळावा म्हणून मी आणि माझी पत्नी भीक मागत आहोत. तसेच लोकांना मदत करण्याचं देखील आवाहन करत आहोत. परिसरात घरोघरी फिरून पैसे मागत आहेत. खूप लोकांनी आम्हाला मदत केली. आम्ही भिकारी नाही तर आमच्या मुलाचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यासाठी पैसे जमा करतोय असंही लोकांना सांगत आहोत. कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत" असंही त्यांनी म्हटलं आहे.
समस्तीपूर येथील सिव्हिल सर्जन, डॉ. एस. के. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही या प्रकरणी नक्कीच कठोर कारवाई करू. दोषी आढळणाऱ्यांना सोडले जाणार नाही असं ते म्हणाले. या आधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. घटनेनंतर लोकांनी सरकारी रुग्णालयावर टीकेची झोड उठवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.