नवी दिल्ली - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाच्या वतीने मानाचा ‘द बेने मेरिटो’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरातील पोलंड वसाहतीच्या नूतनीकरणासह इंडो-पोलीश संबंध दृढ केल्याबद्दल संभाजीराजे यांची पुरस्कारासाठी निवड झाली होती. याचे वितरण पोलंड प्रजासत्ताकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) दिल्ली येथील पोलंड दूतावासात करण्यात आले. याबाबत, संभाजीराजेंनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली.
पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५ हजार निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्प मध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते १९४२ ते ४९ या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतिस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.