UP Sambhal Jama Masjid Violence : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. संभल जिल्ह्यातील जामा मशिदीचा सर्व्हे होत असताना हा हिंसाचार झाला. यावेळी संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यात उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यासह २० जण जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला.
परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्ती, सामाजिक संस्था किंवा लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे. एवढेच नाही तर संभल आणि परिसरातील शाळा २५ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचारात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये नईम, बिलाल अन्सारी, नौमान आणि मोहम्मद कैफ अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, काही समाजविघातक घटकांनी गोळीबार केला. पोलिस अधीक्षकांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे. तर या हिंसाचारात १५ ते २० पोलीस जखमी झालेत, असे मुरादाबादचे विभागीय आयुक्त अंजनेय कुमार सिंह यांनी सांगितले. तसेच, एका हवालदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर उपजिल्हाधिकाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद संभलला भेट देणार!एकीकडे संभलमध्ये प्रशासनाने बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी घातली आहे. दुसरीकडे, नगीना खासदार आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी जाहीर केले आहे की, ते सोमवारी म्हणजेच आज संभल येथे जाऊन हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे.
गोळीबार करून आमच्या लोकांचे प्राण घेतले - चंद्रशेखर आझादचंद्रशेखर आझाद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, "सरकारी गोळ्या थेट बहुजनांवर डागल्या आहेत. ही एक मिथक नाही, तर एक कटू सत्य आहे, जे आपल्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. एससी-एसटी आंदोलन असो, शेतकऱ्यांचे आंदोलन असो किंवा सीएए विरोधी आंदोलन असो - प्रत्येक वेळी सरकारच्या इशाऱ्यावर पोलिसांनी नि:शस्त्र आंदोलकांवर थेट गोळीबार करून आमच्या लोकांचे प्राण घेतले आहेत. मी संभलला जाईन आणि या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. आम्ही आमच्या पीडित कुटुंबांना एकटे सोडणार नाही. संसदेच्या आगामी अधिवेशनात मी सरकारच्या डोळ्यात डोळे घालून म्हणेन की, आपल्या लोकांचा जीव इतका स्वस्त नाही.
काय आहे हे प्रकरण?कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी महाराज यांनी दावा केला होता की, संभलची शाही मशीद हीच हरिहर मंदिर आहे. महंत ऋषी राज गिरी महाराज यांनी १९ नोव्हेंबरला सिव्हिल कोर्टात एक याचिका दाखल करून मशिदीचा सर्व्हे करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने सात दिवसांच्या आत सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. तसेच, सर्व्हे करणाऱ्या टीमला व्हिडिओ आणि फोटोग्राफीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, रविवारी सर्व्हे करणारी टीम मशिदीत पोहोचली होती. त्यावेळी मशिदीच्या बाहेर जमलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला.