काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील संभल येथे मशिदीमधील सर्व्हेक्षणावरून तणाव निर्माण होऊन झालेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यू झाला होता. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने सातत्याने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रियंका गांधी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभलकडे रवाना झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संभलला जाण्यासाठी निवास्थानातून बाहेर पडले आहेत. त्यांच्यासोबत के.सी. वेणुगोपाल, के. एल. शर्मा, उज्ज्वल रमण सिंह, तनुज पूनिया, इम्रान मसूद आदी नेते आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काही दिवसांपूर्वी संभल येथे झालेल्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाने संभलमध्ये १० डिसेंबरपर्यंत नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच दिल्ली बॉर्डरवरही काँग्रेसच्या नेत्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सांगितले की, आम्ही पाच जण तिथे पीडितांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. पाच जणांना जाण्याची परवानगी आहे. कलम १६३ लागू असताना ५ लोक जाऊ शकतात. इथे आम्ही राजकीय पोळ्या शेकत नाही आहोत. संभलमध्ये झालेल्या अत्याचारांना लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही, अजय राय यांनी केला.