उत्तर प्रदेशमधील संभल येथील शाही जामा मशिदीत सर्वे सुरू असताना उफाळलेल्या हिंसाचारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या हिंसाचारादरम्यान वाहनांचीही मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती एवढी बिघडली की, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट बंद ठेवण्यात आले. तसेच शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, संभलमधील हिंसाचाराबाबत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या एफआयआरमधील उल्लेखानुसार जमावाने नियोजनबद्ध कटानुसार पोलिसांवर दगडफेक सुरू केली. एवढंच नाही तर पोलिसांना जिवे मारण्याच्या इराद्याने पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. दंगेखोर पोलिसांकडी नऊ एमएमच्या मॅगझिन लुटून गेले. तसेच पोलिसांकडील पिस्तूल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न झाला.
संभलमधील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी जी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार हिंसक जमावाने आपलं रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून सीसीटीव्ही तोडला होता. एवढंच नाही तर जमावामधील काही समाजकंटकांनी पोलिसांकडील पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यापैकी काहींनी सरकारी ९एमएम मॅगझिन लुटून नेली.
एफआयआरमधील उल्लेखानुसार संभलमधील नखासा चौकामध्ये १५० ते २०० लोकांच्या जमाववाने दुपारी १२.३५ च्या दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर जमावाने हॉकी स्टिक, दांडके आणि दगड घेऊन पोलिसांवर हल्ला केला. तसेच जमावातील दंगेखोरांनी पोलिसांचे प्राण घेण्याच्या इराद्याने हल्ला केला. तसेच त्यांच्या वाहनांची जाळपोळ केली. यादरम्यान, जमावामधून ‘हसन, अझीम, सलील, रिहान, हैदर, वसीम, अयान... या पोलिसांकडून हत्यारं काढून घ्या, त्यांना आग लावून जाळून टाका, कुणीही वाचता कामा नये, आम्ही आमच्या मशिदीचा सव्हे होऊ देणार नाही’, अशी चिथावणी दिली जात होती. तसेच जमावामधून पोलिसांवर जिवे मारण्याच्या इराद्याने गोळीबार केला जात होता, असाही उल्लेख एफआयआरमध्ये आहे.