Sambhal Rahul Gandhi Priyanka Gandhi News:उत्तर प्रदेशातील संभलमध्ये हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आज (४ डिसेंबर)संभलला जाणार आहेत. हिंसा घडलेल्या भागात दौरा करणार असून, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पण, प्रशासनाने मात्र नेत्यांच्या भेटींवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना संभलमध्ये जाता येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२४ नोव्हेंबर रोजी संभलमधील जामा मशिदीबाहेर स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये झडप झाली होती. न्यायालयाने जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर पुरातत्व सर्वेक्षण विभागाची टीम येथे आली. त्यावेळी ही घटना घडली होती.
या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोग जखमी झाले होते. हिंसाचारानंतर चार दिवस बाजारपेठा बंद होत्या. संभल प्रशासनाने सुरक्षा वाढवून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
राहुल गांधी- प्रियांका गांधी संभलला देणार भेट
१० डिसेंबरपर्यंत राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संभलमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना संभलमध्ये जाता येणार की, प्रशासन माघारी पाठवणार, याबद्दल चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींच्या संभल दौऱ्याबद्दल उत्तर काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी सांगितले की, "राहुल गांधी यांचा संभलला जाण्याचा कार्यक्रम आहे. या दौऱ्याचा उद्देश परिसरात सद्भावना आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण करणे आहे. राहुल गांधी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत असतील."
राहुल गांधींना दिल्ली सीमेवर रोखण्याचा प्रयत्न
दरम्यान, संभलमध्ये जाण्यास १० डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना दिल्लीतच रोखण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती आहे. गाजियाबाद पोलिसांनी दिल्ली सीमेवर सुरक्षा वाढवली असून, वाहनांची तपासणी केली जात आहे.
संभलचे जिल्हाधिकारी राजेंद्र पेन्सिया म्हणाले की, "एक आयोग नेमण्यात आला आहे. हा आयोग शहरात झालेल्या हिंसाचाराच्या कारणांचा तपास करणार आहे. आयोगाचे सदस्य १० डिसेंबरपर्यंत इथे राहणार आणि लोकांच्या भेटी घेणार आहेत. त्यामुळे या काळात बाहेरून कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना येण्याची परवानगी देऊ शकत नाही. हे शांतता प्रस्थापित करण्याच्या हिताचे आहे".