Sambit Patra on Shree Jagannath controversial statement: 'भगवान श्री जगन्नाथ हे नरेंद्र मोदींचे भक्त आहेत' असे विधान पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी मतदानापूर्वी केले. या विधानामुळे ते वादात सापडले. त्यांच्यावर विरोधकांकडून टीकास्त्र सोडण्यात आले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पुरीमध्ये रोड शो करून संबित पात्रा यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, पण पात्रा यांच्या विधानामुळे त्यांना सोशल मीडियावर लोकांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग शेअर करत काँग्रेस, बीजेडी आणि इतर पक्षांनी संबित पात्रा यांच्यावर निशाणा साधला. यानंतर आता संबित पात्रा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच प्रायश्चित्त म्हणून ३ दिवसांचा उपवास ठेवला असल्याचेही म्हटले आहे.
संबित पात्रा यांचे स्पष्टीकरण
संबित पात्रा यांनी या वादानंतर स्पष्ट केले की 'पंतप्रधान मोदी हे भगवान जगन्नाथाचे कट्टर भक्त आहेत' असे त्यांना म्हणायचे होते. वाढता वाद पाहता संबित पात्रा यांनी मध्यरात्री एक व्हिडिओ जारी केला. त्या ते म्हणाले, "महाप्रभू श्री जगन्नाथ जी यांच्याबाबत माझ्याकडून चुकीचे वक्तव्य झाले. त्यामुळे मी स्वत: खूप दुखी झालो आहे. मी महाप्रभू श्री जगन्नाथजींच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो. पश्चात्ताप करून माझी चूक सुधारण्यासाठी मी पुढील ३ दिवस उपवास करणार आहे."
केवळ ओडिशाच नाही तर संपूर्ण देशातील लोक भगवान जगन्नाथाची पूजा करतात. करोडो लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. भगवान जगन्नाथ यांना राजकारणात ओढू नका, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजपाला उद्देशून म्हटले होते. जगभरातील करोडो जगन्नाथ भक्त आणि उडिया लोकांच्या श्रद्धेला धक्का बसल्याचेही त्यांनी म्हटले होते.
नवीन पटनायक यांच्या ट्विटवर संबित पात्रा यांनीही स्पष्टीकरण दिले. "आपली सर्वजण बोलताना कधी ना कधी चुकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पुरीतील रोड शोला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मी अनेक मीडिया चॅनेल्सना बाईट्स दिले. त्यात सर्व ठिकाणी मी मोदीजी श्री जगन्नाथ महाप्रभूंचे महान भक्त असल्याचा उल्लेख केला. मात्र चुकून मी एका ठिकाणी याच्या उलट बोललो. तुम्हालाही हे माहीत आहे आणि समजले आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळे कृपया याचा मुद्दा बनवू नये."