ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - ट्रीपल तलाक प्रकरणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदा आयोगावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. ट्रीपल तलाक आणि अन्य महिलांविरोधी प्रथांवर जनमत जाणून घेण्यासाठी लॉ कमीशनने बनवलेली प्रश्नावली म्हणजे बनाव असल्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.
समान नागरी कायदा देश हिताचा नसल्याचे मतही लॉ बोर्डाने नोंदवले आहे. लॉ कमीशन स्वतंत्रपणे काम न करता केंद्र सरकारच्यावतीने काम करत असल्याचा आरोप मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केला आहे. लॉ कमीशनने मागच्या आठवडयात सर्वोच्च न्यायालयात ट्रीपल तलाकच्या प्रथेला विरोध केला होता.
समान नागरी कायदा भारतासाठी योग्य नाही. या देशात अनेक संस्कृती आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. भारतात एक विचारधारा थोपवली जाऊ शकत नाही असे बोर्डाचे हझरत मौलाना वाली रहमानी यांनी सांगितले. ट्रीपल तलाक हा पर्सनला लॉ असून त्यात केंद्र सरकारला बदल करण्याचा अधिकार नाही असे मुस्लिम लॉ बोर्डाचे म्हणणे आहे.