नवी दिल्ली - सरसंघचालक मोहन भागवत यांनी खऱ्या हिंदुत्वाची व्याख्या सांगितली आहे. 'भविष्यातील भारत- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन' या विषयावर आयोजित तीन दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. आपण म्हणतो की, आमचे हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र आहे, याचा अर्थ त्यामध्ये मुस्लीम नको आहे, असे नाही. ज्या दिवशी असे म्हटले जाईल की, यामध्ये मुस्लीम नको. त्या दिवशी हिंदुत्व राहणार नाही, असे भागवत यांनी म्हटले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची व्याख्या सांगण्यासोबतच भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदींची पाठराखणही केली आहे. देशाचं सरकार नागपुरातून चालत नाही, असे म्हणत त्यांनी मोदींच्या विरोधकांना उत्तर दिले. आरएसएसकडून केवळ सल्ला दिला जातो, तेही मागितल्यानंतर असेही भागवत यांनी स्पष्ट केले. नागपुरातून फोन जातो, नागपूरमधून सल्ला दिला जातो, त्यानंतर सरकारचा निर्णय होतो हा अंदाज पूर्ण चुकीचा आहे. त्यांना सल्ला हवा असेल तरच दिला जातो, असे भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले.