नवी दिल्ली- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार गौरी लंकशे व कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने करण्यात आली आहे. कर्नाटकचे प्रसिद्ध लेखक एमएम कलबुर्गी यांची हत्या करण्यासाठी जे पिस्तूल वापरण्यात आलं तेच पिस्तूल वापरून गौरी लंकेश यांची हत्या केली असल्याचा खुलासा फॉरेन्सिक अहवालात झाला आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी टी नवीनकुमारच्या विरोधा दाखल चार्जशीटबरोबर जोडण्यात आलेल्या फॉरेन्सिक अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार, गौरी लंकेश आणि एमएम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी 7.65 एमएम गावठी कट्ट्याचा वापर करण्यात आला होता.
कर्नाटक एसआयटीने 21 मे रोजी दावनगिरी जिल्ह्यातील अमोल काले नावाच्या आरोपीला अटक केली होती. कलबुर्गी यांच्या हत्येत सहभागी झाल्याचा आरोप आहे. हत्येपूर्वी कलबुर्गी यांचा दरवाजा दोन जणांना वाजविला होता. त्या दोघांमध्ये अमोल काले याचा सहभाग होता.
दरम्यान, पोलिसांनी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेला नवीन कुमारच्या पत्नीचाही जबाब नोंदवून घेतला होता. नवीन कुमार सनातन संस्थेशी जोडला असल्याची कबुली त्याच्या पत्नीने दिली होती. नवीन सनातनच्या कार्यक्रमात मला घेऊन जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या एत दिवस आधी नवीन घरी आला व मला मंगळुरूमधील सनातनच्या आश्रमात घेऊन गेला होता, असंही त्यांनी सांगितलं.