Air India : दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्याविमानात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाने बुधवारी घडलेल्या या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) या माहिती दिली आहे. या घटनेबद्दल विचारले असता, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू म्हणाले की, मंत्रालय या घटनेची दखल घेईल आणि विमान कंपनीशी चर्चा करेल. काही चूक झाली असेल, तर आम्ही आवश्यक ती कारवाई करू.
ही घटना बँकॉकमध्ये विमान उतरताना घडली. एअर इंडियाने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच क्रू मेंबर्सनी सर्व नियमांनुसार कारवाई केली. आरोपी प्रवाशाला इशारा देण्यात आला आणि पीडित प्रवाशाला थायलंडमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्लाही देण्यात आला. मात्र, पीडित प्रवाशाने तक्रार दाखल करण्यास नकार दिला. आरोपी प्रवाशाने आपली चूक मान्य केली आणि माफीही मागितली. या घटनेची चौकशी करण्यासाठी एअर इंडियाने एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. आरोपी प्रवाशाविरुद्ध पुढील कारवाई काय करायची हे ही समिती ठरवेल.
अशा घटनांना तोंड देण्यासाठी डीजीसीएने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले जात असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. विमानात अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु बिझनेस क्लासमधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेने सुमारे 3 वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाचे विमान न्यू यॉर्कहून दिल्लीला येत होते. यावेळी बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने दारुच्या नशेत एका वृद्ध महिला प्रवाशावर लघवी केली. त्या घटनेच्या सुमारे एका महिन्यानंतर महिलेने एअर इंडिया आणि डीजीसीएकडे तक्रार दाखल केली होती.
विमान कंपनीलाही दंड ठोठावण्यात आलायानंतर हे प्रकरण वाढत गेले अन् जानेवारी 2023 मध्ये शंकर मिश्रा याला अटक करण्यात आली. एवढेच नाही तर या प्रकरणात एअर इंडियाचीही बदनामी झाली. एअर इंडियावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपनीलाही दंड ठोठावला. त्या प्रकरणात कर्मचाऱ्यांना कंपनीच्या सीईओंच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते.