नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्पष्टपणे पाठिंबा दिला व चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरवला. प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मुखर्जी म्हणाले की, ‘राजकीय पक्षांशी विचारविनिमय करून निवडणूक आयोगाने एकाच वेळी निवडणुका घेण्याचा विचार पुढे न्यावा. देशाचे सामर्थ्य हे अनेकदा आणि विविधतेमध्ये सामावलेले असून, भारताने वादविवाद करणारा भारतीय अशी प्रसिद्धी मिळवलेली आहे, असहिष्णू भारतीय अशी नाही.’लोकशाही समृद्ध होण्यासाठी समंजस आणि विवेकी मन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेतील कामकाज विस्कळीत करण्याच्या प्रकारावर त्यांनी सावध केले. नोटाबंदीच्या विषयावर बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती तात्पुरती मंदावलेली असू शकते, परंतु अर्थव्यवहारांत त्यामुळे अधिक पारदर्शकता येईल. आर्थिक वर्ष २०१६-२०१७ च्या पहिल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्था ७.२ टक्क्यांनी वाढली. त्या आधीच्या वर्षाच्या याच काळातही ती त्याच दराने होती,’ असे ते म्हणाले. आम्ही आर्थिक दृढीकरणाच्या मार्गावर ठामपणे चालत असून, चलनवाढही सुसह्य असल्याचे मुखर्जी म्हणाले. मूल्ये, सहिष्णुता, सोशिकता आणि इतरांबद्दल आदर राहिला, तर सुदृढ लोकशाही राहील. ही मूल्ये प्रत्येक भारतीयाच्या हृदयात व मनात राहिली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एकाच वेळी निवडणुका योग्य
By admin | Published: January 26, 2017 5:23 AM