समीर जोशीच्या जामिनावर सोमवारी निर्णय
By admin | Published: December 18, 2014 10:39 PM
हायकोर्ट : अमरावती व अकोल्यातील प्रकरण
हायकोर्ट : अमरावती व अकोल्यातील प्रकरणनागपूर : शेकडो गुंतवणूकदारांच्या घामाचा पैसा हडपणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने अमरावती व अकोला येथील प्रकरणात जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. यावर २२ डिसेंबर रोजी निर्णय दिला जाणार आहे.न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष गुरुवारी अर्जावर अंतिम सुनावणी पूर्ण झाली. यानंतर न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला. याप्रकरणात समीर व त्याची पत्नी पल्लवी मुख्य आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने पल्लवीला जामीन दिला आहे. सध्या ती बाहेर असून समीर ऑक्टोबर-२०१३ पासून कारागृहात आहे. समीरने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला. अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी फसविले. समीर व पल्लवी यांच्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. श्रीसूर्या समूहांतर्गत गुंतवणूक कंपनीसह बांधकाम, दूध, रेस्टॉरेंट्स, व्यायामशाळा, परिवहन, रुग्णालये, विमा इत्यादी विविध व्यवसाय आहेत. जोशी दाम्पत्याने १८ महिन्यांत रक्कम दुप्पट करून देणे, २५ महिन्यांपर्यंतच्या गुंतवणुकीवर १५० टक्के व्याज देणे अशा विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. जोशी दाम्पत्य चर्चासत्र व एजंट्सच्या माध्यमातून योजनांचा प्रचार करीत होते. समीरला १५ ऑक्टोबर २०१३, तर पल्लवीला २९ ऑक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. समीरतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा, तर शासनातर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.