लंडन - ब्रिटन सरकारने बुधवारी बीसीबीच्या प्रमुख पदी नवीन नावाची घोषणा केली. ब्रिटीश सरकारने अनुभवी टेलिव्हीजन पत्रकार समीर शाह यांना रिचर्ड शार्प यांच्याजागी नियुक्त केलं आहे. समीर शाह हे मूळ भारतीय वंशाचे असून ब्रिटीश संसदी समितीडून त्यांच्या नियुक्तीला अनोमोदन देण्यात आलं आहे. रिचर्ड शार्प यांना एप्रिल २०२३ मध्ये या पदावरुन हटविण्यात आले होते. विशेष म्हणजे सध्या बीबीसी आर्थिक संकटातून जात असतानाच सरकारने बीबीसीची सगळी सूत्रे समीर शाह यांच्याकडे सोपवली आहेत.
समीर शाह यांना गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ टेलिव्हीजन न्यूज इंडस्ट्रीचा अनुभव आहे. त्यांनी बीबीसीमध्ये करंट अफेअर्ससह अनेक महत्त्वाच्या भूमिकांवर काम केलंय. सरकारचा उमेदवार म्हणून नियुक्त केल्यास काम करायला आवडेल, असेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते. आता, ब्रिटीश सरकारने बीबीसीच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे समीर शाह यांचा जन्म सन १९५२ साली सध्याच्या छत्रपती संभाजीनगर आणि तत्कालीन औरंगाबादमध्ये झाला होता. ते मूळ भारतीय वंशाचे आहेत. अमृत शाह आणि उमा बकाया असे त्यांच्या आई-वडिलांचे नाव आहे.
दरम्यान, बीबीसीने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या न्यूजनाईट कार्यक्रमाचे प्रसारण बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. आता, सराकरने बीबीसीच्या लायसन्स शुल्कात वाढ करण्याची जबाबदारी समीर शाह यांच्यावर सोपवली आहे, जे बीबीसीचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. दरम्यान, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी काही दिवसांपूर्वीच वार्षिक शुल्कात ९ टक्के वाढ थांबविण्याची योजना बनवली असल्याचं वृत्त युके मीडियाने दिले होते. सध्या हे शुल्क प्रतिकुटुंब (२०० डॉलर्स) एवढे आहे.