राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी आता एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. समीर वानखेडे आज थेट दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (National Commission For Schedule Caste-NCSC) अध्यक्ष सुभाष रामनाथ पारधी (Subhash Ramnath Pardhi) यांची भेट घेतली. या भेटीत समीर वानखेडे यांनी आपल्या घटस्फोटाची कागदपत्रं, मुलाचा जन्म दाखला आणि जातीच्या दाखल्याची कागदपत्रं पारधी यांच्यासमोर सादर केली असल्याची माहिती समोर आली आहे.
"जे काही तथ्य आणि कागदपत्रांची मागणी माझ्याकडे झाली होती ती सर्व कागदपत्रं मी आज सुपूर्द केली आहेत. माझ्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि लवकरच आयोगाचे अध्यक्ष त्यावर उत्तर देतील", असं समीर वानखेडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर म्हणाले. समीर वानखेडे यांनी एससी कमीशनसमोर त्यांनी घेतलेल्या घटस्फोटाशी संबंधित कागदपत्रं, लग्नाचं प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाच्या जन्माचा दाखला सादर केला आहे.
"समीर वानखेडे आज त्यांच्यावरील आरोपांसंदर्भात येथे आले होते. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची आम्ही माहिती घेऊन आणि त्यांची पडताळणी करू", असं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सुभाष पारधी म्हणाले.
राष्ट्रपतींकडे करू तक्रार- नवाब मलिकनवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला. समीर वानखेडे हिंदू नसून मुसलमान आहेत आणि जातीच्या खोट्या प्रमाणपत्राचा वापर करुन त्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला आहे. त्यातूनंच त्यांनी आयआरएस पदासाठीची नोकरी मिळवली होती, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यासोबतच वानखेडे यांनी एनसीएससीचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरही मलिक यांनी आक्षेप नोंदवला आहे. "अरुण हलदर एक भाजपाचा नेता आहे. पण ते एका संविधानिक पदावर काम करत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा मान राखला पाहिजे. ते समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन कागदपत्रांची माहती घेतात आणि त्यांना क्लीन चीट देतात. क्लीन चीट देण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. राष्ट्रपतींकडे मी त्यांची तक्रार करणार आहे", असं नवाब मलिक म्हणाले.