मुंबई - आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केलंय. त्यामुळे, याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समीर वानखेडेंच्या पोस्टींगबद्दल मलिक यांनी आरोप केले होते. आता, एनसीबीने हे आरोप फेटाळले असून प्रेसनोट जारी केली आहे. तर, समीर वानखेडे यांनीही आरोप फेटाळत मी तुरुंगात जायलाही तयार असल्याचं म्हटलंय.
मलिक यांच्या आरोपावर, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनीही सांगितले की, नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मालिकांवर याप्रकरणी कायदेशीर कारवाई करतील. 2019 मध्ये मी मुंबईतील पोस्टींगसाठी अर्ज केला होता, हे प्रकरण त्याआधीचं आहे. नुकतेच एनसीबीने पत्रक जारी करून स्पष्टीकरण दिलंय. तसेच, खंडणी, एक्स्टॉर्शन हे अतिशय खालच्या पातळीचे शब्द आहेत, मी मॉलदीवला गेलो होतो, पण सरकारची परवानगी घेऊनच गेलो होतो. मी माझ्या कुटुंबासमवेत तिथं गेलो होते, त्यास ते खंडणी म्हणत असतील तर ते योग्य नाही.
मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असेही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळत त्यांना चॅलेंज दिलंय. तसेच, गेल्या 15 दिवसांपासून माझ्या दिवंगत आईबद्दल, सेवानिवृत्त वडिलांबद्दल, माझ्या बहिणीबद्दल त्यांनी अतिशय गलिच्छ भाषा वापरली, ते वैयक्तीक टीका करत आहेत. त्यामुळे, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचं वानखेडे यांनी म्हटलंय.
काय म्हणाले होते मलिक
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सभेत बोलताना मलिक यांनी समीर वानखेडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आता, एनसीबीने पत्रक जारी करत याचं स्पष्टीकरण दिलंय. वानखेडे यांच्या मुंबईसाठी बदलीच्या अर्जाबाबतचंही एनसीबीने सांगितलंय.
एनसीबीचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर समीर वानखेडेंबद्दल व्हायरल झालेलं आणि पसरविण्यात आलेली माहिती अत्यंत चुकीची आहे, असे म्हणत प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये, समीर वानखेडे यांना 31 ऑगस्ट 2020 रोजी मुंबईत 6 महिन्यांच्या कालावधीसाठी पाठविण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर, दुबईला जाण्यासंदर्भात त्यांनी कधीही अर्ज केला नव्हता, असेही एनसीबीने म्हटले आहे. तसेच, एनसीबीच्या परवानगीनंतर समीर वानखेडे यांनी 27 जुलै 2021 रोजी केलेल्या अर्जानंतर कुटुंबासह मालदीवला गेल्याचं एनसीबीने स्पष्ट केलंय.