लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या पहिल्या विवाहासंदर्भातील घटस्फोटाची कागदपत्रे व अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केले. या कागदपत्रांची तपासणी करून आयोग अहवाल देणार आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असल्याचा दावा केला होता. मात्र, वानखेडे यांनी मलिक यांचा आरोप फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी विजय सांपला यांची दिल्लीत भेट घेतली.
महाराष्ट्र सरकारकडून कधी माहिती मिळते, याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. वानखेडे यांची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आयोग नक्कीच ठोस पावले उचलेल, असेही विजय सांपला यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने वानखेडेप्रकरणी महाराष्ट्र सरकारला २९ ऑक्टोबर रोजी एक नोटीस जारी केली असून, सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले. - विजय सांपला, अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग