नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानदरम्यान धावणारी रद्द करण्यात आलेली समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील रेल्वे विभागाने समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे दर रविवारी आणि बुधवारी दिल्लीतून पाकिस्तानला रवाना होणारी समझौता एक्सप्रेस आज रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी अटारीला जाणार आहे. त्यानंतर लाहोरला जाणार आहे. तसेच, समझौता एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतात रवाना होणार आहे.
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
या कारावाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र, ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले आहे.