पाटणा : दारुबंदीच्या निर्णयामुळे राज्याच्या महसुलाचे झालेले हजारो कोटींचे नुकसान भरून काढण्याकरिता बिहारमधील नितीशकुमार सरकारने आता समोसा आणि कचोरीसह काही वस्तूंवर लक्झरी कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक लक्झरी सामानांवरील कर वाढवून १३.५ टक्के करण्याला मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर प्रधान सचिव ब्रजेश महरोत्रा यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, प्रति किलो ५०० रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मिठार्इंवरही हा कर लागेल. यापूर्वी या मिठाई करमुक्त होत्या. याशिवाय ब्रँडेड आणि नमकीन खाद्यपदार्थ, चनाचोर, भुजिया डालमोट कराच्या चौकटीत आले आहेत. सुक्या मेव्यावरील कर ५ टक्क्यांवरून वाढवून १३.५ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय ५०० रुपये मीटरपेक्षा अधिक किमतीचे कापड आणि २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या साड्यांवर ५ टक्के कर द्यावा लागणार आहे. यापूर्वी यावर कर द्यावा लागत नव्हता. (वृत्तसंस्था)
समोसा, कचोरीवर बिहारमध्ये कर
By admin | Published: January 14, 2016 1:56 AM