नोएडा सेक्टर १२ मध्ये स्टॉलवर समोसे विकणाऱ्या एका १८ वर्षांच्या मुलाने NEET क्रॅक केली आहे. त्याने सर्व अडथळे पार करत घवघवीत यश मिळवलं. दैनंदिन जीवनात आव्हानं असूनही सनी कुमारने मोठं स्वप्न पाहिलं. अलख पांडे याने सोशल मीडियावर त्याची प्रेरणादायी गोष्ट शेअर केली.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सनी कुमारची भाड्याची खोली दिसत आहे ज्यामध्ये भिंतींवर छोट्या छोट्या नोट बनवून लावलेल्या दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अलख पांडे सनी कुमारने अभ्यासासाठी बनवलेल्या छोट्या नोट्स वाचताना दिसत आहे. काही सेकंदांनंतर, सनी अलख पांडेला सांगतो, मी सर्व अभ्यास आता केलेला आहे.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये अलख पांडे सनी कुमारने केलेला समोसा खाताना दिसत आहे. सनी म्हणतो, शाळा संपल्यानंतर मला स्टॉल लावण्यासाठी एक ते दोन तास मिळायचे. वडील आहेत, पण ते मला साथ देत नाहीत. अलख पांडेने जेव्हा त्याला विचारलं की त्याला घरातील कोण सपोर्ट करतं, तेव्हा सनीने घरात फक्त आईच मला साथ देते. आईचा पूर्ण पाठिंबा आहे असं सांगितलं.
सनी कुमार म्हणाला की, "मी म्हणायचो, आई, प्लीज मला शिकव, माझ्या खांद्यावर हात ठेव. आई, प्लीज मला कसंपण करून शिकव. मला अभ्यास करायचा आहे. मला शिकायचं आहे. काहीतरी बनायचं आहे." सनीपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.