जर तुम्हाला विचारले की तुम्ही वार्षिक 30 लाख पगार असलेली कॉर्पोरेट नोकरी सोडून समोसे विकणार का? काहींना हा वेडेपणा आहे. पण काही उत्साही लोक आहेत, जे असे काम करत आहेत आणि यशस्वीही आहेत. निधी सिंह आणि तिचा पती शिखर वीर सिंह यांची अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. या जोडप्याने आपली चांगली नोकरी सोडून समोसे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. आता हे जोडपे समोसे विकून दररोज तब्बल 12 लाख रुपये कमावतात. पण यासाठी त्यांनी खूप मेहनत केली.
निधी सिंह आणि पती शिखर वीर सिंह यांनी हरियाणातील एका इंजीनियरिंग कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक केले आहे. यानंतर निधीने गुरुग्राममधील एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये नोकरी सुरू केली. तर शिखर वीर सिंहने हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसमधून एमटेक केले. यानंतर 2015 मध्ये या जोडप्याने नोकरी सोडली. त्यावेळी शिखर वीर सिंह हे बायोकॉनमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट होते आणि निधीचा पगार वार्षिक 30 लाख रुपये होता.
विकावं लागलं घर
एक वर्षानंतर, 2016 मध्ये, त्यांनी बंगळुरूमध्ये आपल्या बचतीतून समोसा सिंह नावाचा स्टार्टअप सुरू केला. समोसा सिंह सुरू झाला पण लवकरच मोठ्या स्वयंपाकघराची गरज भासू लागली. यासाठी या जोडप्याला 80 लाखांना त्यांचं घर विकावं लागलं. या घरात फक्त एक दिवस राहू शकलो. मोठ्या ऑर्डरसाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी फ्लॅट विकणे योग्य मानले. या पैशातून दोघांनी बंगळुरू येथे भाड्याने फॅक्ट्री घेतली. व्यवसाय वाढवण्यासाठी घर विकून फॅक्ट्री भाड्याने घेण्याचा निर्णय अगदी योग्य होता.
दररोज सुमारे 30 हजार समोसे
व्यवसाय यामुळे अनेक पटींनी वाढला. आता ही जोडी दररोज सुमारे 30 हजार समोसे विकते. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 45 कोटी रुपये आहे. समोसे विकण्याची सुरुवातीची कल्पना शिखर वीर सिंह याची होती. कॉलेजच्या दिवसात त्याला ही कल्पना सुचली. त्याला एसबीआय बँकेसमोर समोसे विकायचे होते. पण तेव्हा निधीनेच त्याला शास्त्रज्ञ होण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. आता त्यांचा व्यवसाय अत्यंत उत्तम सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"