बिहारमधील दरभंगा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका उंदरामुळे दरभंगा येथून नवी दिल्लीकडे जाणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस थांबवावी लागली. ही घटना छपरा स्टेशनजवळ घडली.
दरभंगाहून दिल्लीकडे जाणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस छपरा स्टेशनजवळ आली असताना काही लोकांनी डब्याखालून धूर येत असल्याचे पाहिले. त्यानंतर ट्रेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे ट्रेनमध्ये गडबड आणि गोंधळ सुरू झाला. त्यानंतर ट्रेन मध्येच थांबवाली लागली. तसेच प्रवासी सैरावैरा पळू लागले.
ट्रेनचे लोको पायलट, गार्ड आणि रेल्वे पोलिसांनी घडल्या प्रकाराचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान, एक उंदीर ट्रेनच्या डब्यात घुसल्याचे दिसून आले. त्याने काही वायर कुडतरल्या होत्या. त्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि ठिणगी पडली. ट्रेनची पूर्ण तपासणी केल्यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
वाराणसी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, १२५६५ बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या एस४ डब्याच्या खाली लागलेल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये उंदीर घुसला होता. त्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि डब्याच्या खालून धूर येऊ लागला.
त्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये आग लागल्याचा संशय आला. ते गोंधळून गेले. मात्र या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ट्रेनलाही कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही.