सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधानांची मालिका सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यानंतर डीएमके खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्हीशी केली आहे. तर बिहारमध्ये महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या आरजेडीचे नेते जगदानंतर यांनी डोक्याला टिळा लावून फिरणाऱ्या लोकांनी भारताला गुलाम बनवले आहे. देशात मंदिर बांधून काम भागणार नाही.
याआधी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियासोबत केली होती. ते म्हणाले होते. की, सनातन धर्माचा केवळ विरोध करून भागणार नाही. तर तो समाप्त केला पाहिजे. उदयनिधी यांच्या या विधानावरून देशभरात वाद आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच भाजपा या विधानावरून इंडिया आघाडीवर टीका करत आहे.
दरम्यान, डीएमकेचे खासदार ए. राजा म्हणाले की, सनातन धर्माबाबत उदयनिधी यांनी घेतलेली भूमिका ही काहीशी सौम्य होती. मी म्हणतो सनातन धर्माची तुलना ही सामाजिक कलंक असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरियाशी केली आहे. मात्र सनातन धर्माची तुलना ही एचआयव्ही आणि कुष्ठरोग यासारख्या सामाजिक कलंक असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे.
दुसरीकडे इंडिया आघाडीतील आणखी एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, टिळा लावून फिरणाऱ्यांनी भारताला गुलाम बनवले. त्यांनी मंदिर बनवून आणि मशीद पाडून देश चालणार नाही. कार्यकर्त्यांना संबोधित करताना जगदानंद यांनी सांगितले की, देश गुलाम कधी झाला. त्यावेळी कर्पूरी ठाकूर, लालूप्रसाद यादव. राम मनोहर लोहियासारखे नेते होते का? जगदानंद सिंह यांनी सांगितले की, देशामध्ये हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.