चेन्नई : सनातन धर्म समता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे आणि त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे मत द्रमुकच्या युथ विंगचे सचिव आणि तामिळनाडूचे युवा कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी व्यक्त केले. सनातन धर्माची तुलना त्यांनी कोरोना व्हायरस, मलेरिया आणि डेंग्यूशी केली. अशा गोष्टींना विरोध करू नका, तर नष्ट करा, असे आवाहनही त्यांनी केले. या वक्तव्यावर भाजपचे आयटी विभागाचे प्रभारी अमित मालवीय म्हणाले की, द्रमुक नेत्याने सनातन धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के लोकसंख्येचे निर्मूलन करण्याचे आवाहन केले आहे. हे आरोप उदयनिधींनी फेटाळून लावले आहेत.
उदयनिधी नेमके काय म्हणाले?
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी म्हणाले की, सनातन हे नाव संस्कृतमधून आहे. सनातनचा अर्थ काय? तो शाश्वत आहे. म्हणजे तो बदलता येत नाही. कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ते म्हणाले की, सनातनने जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली. ते म्हणाले की, सनातनने स्त्रियांसाठी काय केले? त्यांनी पती गमावलेल्या स्त्रियांना आगीत ढकलले (पूर्वीची सती प्रथा). त्या काळात बालविवाहही झाले; पण द्रमुक सरकारने महिलांना बसमध्ये मोफत प्रवास दिला. विद्यार्थिनींना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी १००० रुपये महिन्याला मदत दिली.
मतांसाठी सनातन धर्माचा अपमानमत बँक आणि तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘सनातन धर्म’चा अपमान केला जात आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलासह द्रमुकचे नेते सनातन धर्म संपुष्टात आणला पाहिजे, असे म्हणत आहेत. या लोकांनी मतपेढी आणि तुष्टीकरणाचे राजकारण करण्यासाठी सनातन धर्म संपवण्याची भाषा केली.. आपली संस्कृती.. आपल्या इतिहासाचा आणि सनातन धर्माचा अपमान केला आहे.- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री