Sanatana, Dengue Malaria - Udhayanidhi: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. उदयनिधी यांनी आपल्या वक्तव्यात सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत.
एका वृत्तानुसार, उदयनिधी यांनी शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले, "सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्यापेक्षा त्या रद्दबातल केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. सनातन धर्माला नुसता विरोध करू नये, त्यापेक्षा तो मूळापासून नष्ट करायला हवा. सनातन हे संस्कृत नाव आहे. हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे."
भाजपाकडून नरसंहाराचा मुद्दा उपस्थित
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. उदयनिधी स्टॅलिन यांनी देशातील 80 टक्के लोकसंख्येचा नरसंहार करण्याची भाषा केली आहे, असा आरोप त्यांनी केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा मलेरिया आणि डेंग्यूशी संबंध जोडला आहे. केवळ विरोध न करता ते संपवले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. थोडक्यात तो सनातन धर्माचे पालन करणाऱ्या भारतातील 80 टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराची हाक देत आहेत. द्रमुक हा विरोधी आघाडीचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकालीन सहयोगी आहे. मुंबईच्या बैठकीतच यावर सहमती झाली होती का?" असा खोचक सवाल भाजपाकडून करण्यात आला.
उदयनिधींचा खुलासा, नरसंहाराची चर्चा नाही
अमित मालवीय यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सनातन धर्माच्या अनुयायांचा नरसंहार करण्याबाबत कधीही बोललो नसल्याचे सांगितले. मात्र, उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी पुन्हा म्हटले की, "मी सनातन धर्मामुळे त्रस्त असलेल्या उपेक्षित समाजाच्या वतीने बोलत आहे. माझ्या वक्तव्याबाबत मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार सामाजिक न्याय राखण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी संघर्ष करत राहील. अशा भगव्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही पेरियार, अण्णा आणि कलैगनार (करुणानिधी) यांचे अनुयायी आहोत आणि सामाजिक न्याय राखण्यासाठी नेहमीच लढा देऊ."