मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण ? सगळे घाबरतात; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 11:53 AM2020-02-20T11:53:32+5:302020-02-20T11:55:04+5:30
सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आणि खासदार संदीप दीक्षित यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पक्षाशी निगडती अनेक गोष्टीवर दीक्षित यांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षासमोर असलेल्या मुख्य आव्हानासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.
सध्या काँग्रेस पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे नेतृत्व निवडणे होय. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. किंबहुना शोधण्यात यश आले नाही. सर्व नेते घाबरतात. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधावी कोणी याच गर्तेत सर्व नेते असल्याचे दीक्षित यांनी म्हटले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दीक्षित म्हणाले की, सध्याच्या घडीला पक्षात सहा ते आठ लोक आहेत, जे पक्षाचं नेतृत्व करू शकतात. असं सांगताना त्यांनी वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला आहे. वरिष्ठांनाच निष्क्रीयता हवी आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून माझी निराशा होत आहे. राज्यसभेत असलेले आणि माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
नेत्यांच्या बौधिक योगदानाची गरज
काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग, अशोक गेहलोत आणि कमलनाथ हे नेते आहेत. मात्र हे नेते एकत्र का नाहीत, असा प्रश्न दीक्षित यांनी उपस्थित केला. तसेच एके एन्टनी, पी. चिदंबरम, सलमान खुर्शीद, अहमद पटेल यांच्यासारखे नेते काँग्रेसकडे आहे. या नेत्यांकडे राजकारणात चार ते पाच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पक्षाला बौधिकरित्या योगदान देण्याची या नेत्यांवर वेळ आली असून नेतृत्व निवडीतही हे नेते महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात, असंही दीक्षित यांनी म्हटले आहे. संदीप दीक्षित एकमेव नेते आहे, ज्यांनी पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस दाखवले.