नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीमधून (IIT Delhi) बीटेक केलेल्या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचा संन्यासी बनण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदीप कुमार भट्ट (Sandeep kumar Bhatt) असे या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचे नाव आहे. त्यांनी लग्नही केलेले नाही. एक कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी सोडून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारला.
संन्यासी झाल्यावर ते स्वामी सुंदर गोपाल दास (Swami Sundar Gopal Das) झाले. ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी सांगितले की, 2002 मध्ये त्याने आयआयटी दिल्लीतून बी.टेक केले. बी.टेकमध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळवले. 2004 मध्ये एमटेक पूर्ण केले. 2004 ते 2007 पर्यंत लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) येथे व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर 2007 मध्येच संन्यासी होण्याचा निर्णय घेतला.
यंत्राचा दर्जा वाढत आहे, पण माणसाची गुणवत्ता कमी होत आहे. दरवर्षी लाखो गुन्हे घडतात, हा माणसाची गुणवत्ता ढासळत असल्याचा प्रमाण आहे, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, 'माझ्या मते सुशिक्षितांनी साधू-संत झाले पाहिजेत. शेवटी, मोठ्या कंपन्यांनी आयआयटीमधून लोकांना नोकरी देण्याचे कारण काय आहे? समाजात चांगल्या गोष्टींना चालना द्यायची असेल तर अशा लोकांनीही पुढे आले पाहिजे', असेही संदीप भट्ट यांनी सांगितले.
दरम्यान, इंजिनीअरिंग करत असताना संदीप भट्ट यांच्या लक्षात आले की, आपल्या आजूबाजूला अनेक इंजिनियर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते आहेत. पण, समाजाला वेगळा मार्ग दाखवू शकेल, असा माणूस नाही. लोकांचे चारित्र्य सुधारण्यासाठी. धार्मिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी संदीप भट्ट संन्यासी बनले.
लोक भौतिक सुखांच्या मागे लागले आहेत, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, संदीप भट्ट उर्फ गोपाल दास यांनीही आत्महत्या, ड्रग्ज याविषयी भाष्य केले. सर्व चुकीच्या सवयी सुधारण्यासाठी धार्मिक शिक्षणाची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच, लोकांना माणूस कसे व्हायचे हेच कळत नाही. लोकांमध्ये स्वयंनियमन नाही. नोबेल मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारलं तर ते खरंच मोठं काम आहे, असे संदीप भट्ट यांनी सांगितले.
याचबरोबर, जेव्हा कुटुंबीयांना ते संन्यासी झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कुटुंबातील कोणत्याही सदस्याची असते तशीच होती. पण, त्यांना हेच करायचे आहे, असे त्यांनी घरच्यांना समजावून सांगितले. आयआयटी दिल्लीत असताना त्यांनी श्रीमद भागवत गीताही वाचली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचे संदीप भट्ट म्हणतात.