Sandeshkhali Case: पश्चिम बंगालमध्ये एका शीख IPS अधिकाऱ्याचा उल्लेख ‘खलिस्तानी’ केल्यामुळे वाद वाढला आहे. यामुळे कोलकाता येथील भाजप मुख्यालयाबाहेर शीख समुदायातील लोकांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली. भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालपोलिसांत विशेष अधीक्षक म्हणून तैनात असलेले IPS जसप्रीत सिंग यांना खलीस्तानी म्हणल्याचा आरोप आहे. यावरुन काँग्रेसनेही भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखलीमध्ये परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला असून, मंगळवारी (20 फेब्रुवारी) भाजपचे अनेक आमदार संदेशखलीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना जसप्रीत सिंग यांनी रोखले, ज्यामुळे त्यांचा भाजप आमदारांसोबत वाद झाला.
काँग्रेसचा भाजपवर घणाघातकाँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "पगडी घातल्यामुळे भाजपावाले पोलीस अधिकाऱ्याला खलिस्तानी म्हणत आहेत. रात्र-दिवस देशाची सेवा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला खलिस्तानी बलणे अत्यंत खालच्या पातळीची मानसिकता आहे. पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनीही हा व्हिडिओ शेअर करत या घटनेला "लज्जास्पद" म्हटले.
'मी पगडी घातल्यामुळे मला खलिस्तानी म्हणता'या व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंग आणि आंदोलकांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. यावेळी काही आंदोलक त्यांना खलिस्तानी बोलू लागतात. यावर अधिकारी चिडून म्हणतात, 'मी पगडी घातल्यामुळे तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात. तुमची हिम्मत कशी झाली? पोलिसाने पगडी घालून ड्युटी केली तर तो खलिस्तानी होतो का? ही तुमची बोलायची पातळी आहे? मी तुमच्या धर्मावर बोललो नाही, तुम्ही माझ्या धर्मावर बोलू नका. मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेन,' असा इशारा जसप्रीत सिंग यांनी दिला.