Sandeshkhali Violence : पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील संदेशखली भागातील हिंसाचारामुळे राजकारण तापले आहे. या भागात राहणाऱ्या महिला न्यायाची मागणी करत आहेत. यातच आता एका महिलेने थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फटकारले. "आम्हाला 1000 रुपये (लक्ष्मी भंडार योजनेंतर्गत) देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्हाला तुमचे पैसे नको, सन्मान हवा आहे," अशी मागणी त्या महिलेने केली. परिसरातील महिलांनी अनेक वेळा पोलिसांकडे (लैंगिक छळाबाबत) तक्रार केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असा आरोपही तिने केला आहे.
ममता बॅनर्जींना हिंसाचार दिसत नाही का?ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना महिलेने सांगितले की, "आम्ही अनेकदा तक्रार केली, पण पोलिसांनी काहीही केले नाही. इथले पोलीस बंगालच्या लोकांसाठी काम करत नाहीत. ममता बॅनर्जी काय करत आहेत? त्यांना इथे काय चाललंय, ते दिसत नाही का? त्या 1000 रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्हाला सन्मान आणि शांतता हवी आहे," असं ती महिला म्हणाली.
संदेशखलीत आतापर्यंत काय घडले?संदेशखलीमध्ये स्थानिक महिलांनी तृणमूल (TMC) नेता शाहजहान शेख याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलांनी दावा केला की, शाहजहान शेख, शिबू हाजरा आणि उत्तम सरदार त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिळून अनेक वर्षांपासून महिलांचा लैंगिक छळ करत आहेत. आदिवासींच्या जमिनी बळजबरीने बळकावल्या जातात आणि पोलिसांची मदत घेतल्यानंतरही त्यांना तृणमूलच्या नेत्यांशी तडजोड करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण परिसरात निदर्शने आणि तणावाचे वातावरण आहे. शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांना अटक करण्यात आली आहे, मात्र शाहजहान फरार आहे. शहाजहान शेखवर संदेशखलीत दंगल भडकवण्याचा आरोपदेखील आहे.