- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकार खोटा प्रचार करीत असल्याचा गंभीर आरोप करीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षनेत्यांना लोकशाही, संविधान आणि काँग्रेस विचारधारेचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू करण्यासोबत भाजप आणि संघाच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करून त्याविरुद्ध मुकाबला करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे आवाहन केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षनेत्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वेषमूलक प्रचाराविरुद्ध वैचारिक लढा द्यायचा आहे. हा लढा जिंकण्यासाठी दृढ विश्वासाने लोकांसमक्ष संघ आणि भाजप सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करावा लागेल, असे सांगितले. काँग्रेस सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत सोनिया यांनी पक्षांतर्गत शिस्त आणि एकजूट राखण्यावर भर दिला. सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा निश्चित चांगली राहील, असा विश्वास व्यक्त केला.
महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटन मजबुती महत्त्वाचीपक्षांतर्गत संघर्ष मतभेदावरून सुनावत त्या म्हणाल्या की, पक्षात शिस्त आणि एकजूट असणे अत्यावश्यक आहे. पक्ष संघटन मजुबती, हे आम्हा सर्वांसाठी सर्वोपरी आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षाही संघटनेची मजबुती महत्त्वपूर्ण आहे. यातच सामूहिक आणि वैयक्तिक हित आहे.