नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हल्ल्याची शिकवण देतो, तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. आरएसएसचा एकजुटीने मुकाबला करून तीन कृषी कायदे मोदी सरकारला रद्द करायला भाग पाडू, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.राजस्थानातील अलवार जिल्ह्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी वरील वक्तव्य केले.टिकैत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) एका नेत्यास अटक करण्यात आली आहे. अभाविप ही भाजपची विद्यार्थी शाखा आहे.तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात असून, किमान आधारभूत किंमत या कायद्यामुळे संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या संपून शेतकऱ्यांना पूर्णत: उद्योगपतींच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल, अशी भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.आम्ही संघाचा एकजुटीने मुकाबला करूराहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, संघ हल्ला करावयास शिकवतो. अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवतो. आम्ही संघाचा एकजुटीने मुकाबला करू. शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 5:46 AM