ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 20 - उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून पुन्हा एकदा आरक्षणविरोधी राग आळवण्यात आला आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी देशातून आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे असे वक्तव्य केले आहे. जयपूर येथे आयोजित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना वैद्य म्हणाले, आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आवश्यकता असून त्याजागी अशी व्यवस्था लागू करण्यात यावी ज्यात सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल. मात्र या वक्तव्यावरून वाद निर्माण होऊन वातावरण तापव्यावर वैद्य यांनी घुमजाव केले असून, समाजात जोपर्यंत भेदभाव असेल तोपर्यंत आरक्षण कायम राहणार असल्याचे सांगत संघ हा आरक्षणाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले.
तत्पूर्वी या कार्यक्रमात बोलताना, आरक्षण जर दीर्घकाळ सुरू राहिले तर ते देशाला फुटीरतावादाकडे घेऊन जाईल अशी भीती मनमोहन वैद्य व्यक्त केली होती, ते म्हणाले, "कुठल्याही देशात आरक्षणाची व्यवस्था स्थायी राहणे चांगली बाब नाही, सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळाले पाहिजे, नाहीतर अशी व्यवस्था देशाला फुटीरतावादाकडे घेऊन जाणारी ठरेल."
Maine kaha tha jab tak samaaj mein bhedbhaav hai tab tak aarakshan rahega.Sangh aarakshan ke paksh mein hai: Manmohan Vaidya,RSS pic.twitter.com/s6lHBjvium— ANI (@ANI_news) 20 January 2017
वैद्य यांनी यावेळी हिंदुत्वातील विविधतेचाही उल्लेख केला. हिंदुत्व नेहमीच विविधतेची चर्चा करते आणी एका आदर्श हिंदू राष्ट्रात भारताची धार्मिक विविधता स्वीकार्य असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच संविधानातील धर्मनिरपेक्ष या शब्दावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "संविधानात सेक्युलर शब्द समाविष्ट करण्याची मागणी केली होती का, मग हा शब्द संविधानात का समाविष्ट करण्यात आला," असा सवाल त्यांनी केला.
#WATCH Senior RSS Leader Manmohan Vaidya speaks on reservations pic.twitter.com/dfqUNFaFwv— ANI (@ANI_news) 20 January 2017
मात्र वैद्य यांचे हे वक्तव्य निवडणुकांच्या काळात भाजपासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. गतवर्षी बिहार निवडणुकीपूर्वी सुद्धा सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसला होता. दरम्यान, लालूप्रसाद यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी वैद्य यांच्या वक्तव्यावर टीकास्र सोडले आहे.