हैदराबाद : कर न भरल्याने टेनिसपटू सानिया मिर्झाने सेवाकर विभागाने नोटीस दिली. सेवाकर विभागाच्या मुख्य आयुक्तांनी ६ फेब्रुवारी रोजी ही नोटीस जारी करत सानियाने स्वत: वा एजंटच्या माध्यमातून १६ फेब्रुवारीला हजर राहावे, असे सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, त्यांच्याकडे तपासाशी संबंधित कागदपत्रे आहेत. केंद्रीय अबकारी कायद्याच्या १९४४ च्या अंतर्गत, अर्थ कायद्याच्या १९९४ च्या अंतर्गत सेवा कर प्रकरणात सानिया मिर्झाला १६ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या नोटिशीत असेही म्हटले आहे की, जर या समन्सचे पालन करण्यात आले नाही आणि जाणीवपूर्वक अनुपस्थिती दर्शविली तर आयपीसीच्या नियमांच्या आधारे कारवाई करण्यात येईल. एक कोटींचा कर भरला नाही? तेलंगणा सरकारने सानिया मिर्झाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. त्या बदल्यात सानियाला एक कोटी मिळाले. याच रकमेवरील सेवाकर सानियाने भरला नसल्याचे समजते. एक कोटीच्या रकमेवर व्याजाशिवाय १४.५ टक्के कर आकारला जाईल. यावर दंडही लावला जाऊ शकतो. जुलै २०१४ मध्ये तेलंगणा सरकारने सानियाची बॅ्रंड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली होती. मी उत्तर देण्यास सक्षम : मी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार असून, त्यानंतर मला पाठवण्यात आलेल्या नोटीसला संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांपुढे माझे म्हणणे सादर करेन, असे सानिया मिर्झाने स्पष्ट केले आहे.
सानिया मिर्झाला करनोटीस
By admin | Published: February 10, 2017 12:37 AM