सुरेश भटेवरानवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वर्ष २0१६-१७ साठी देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी स्वच्छता विद्यालयाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वच्छतेच्या आदर्श मानदंडांची कसोशीने अमलबजावणी करणा-या देशातल्या १७२ शाळांचा या स्पर्धेत पुरस्कार व प्रशस्तीपत्राने सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शाळांमधे महाराष्ट्रातल्या १५ शाळांचा समावेश आहे.मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विजेत्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशभरातल्या २ लाख ६८ हजार शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्या शाळांना मिळालेल्या पुरस्काराचे ५0 हजार रुपये व प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे. देशातील ३ राज्ये, ११ जिल्हे व १७२ शाळांना स्वच्छतेबाबत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल या सोहळयात गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यास मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव आनंद स्वरूप, अपर सचिव अनिता करवल उपस्थित होते.स्वच्छता विद्यालय पुरस्कार स्पर्धेच्या निकषांमधे, शाळेत पाण्याची व शौचालयांची उपलब्धता, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत घडवलेला बदल, क्षमता विकास इत्यादी मुद्यांचा समावेश होता. स्पर्धेसाठी तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळ्यांवरील समित्यांनी गुणांकन करून देशातल्या १७२ शाळांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातल्या १५ शाळांचा समावेश आहे.स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महाराष्ट्रातल्या ज्या १५ शाळांचा समावेश आहे, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. १) शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींची शाळा, कोठाली (नंदूरबार) २)शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, किनवट(नांदेड) ३) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा (गडचिरोली),४)एनएनएमसी माध्यमिक शाळा, आंबेडकर नगर (ठाणे), ५) मुलांची शासकीय निवासी शाळा, शिरूर (बीड),६) जिल्हा परिषद शाळा उंडेमळा,(अहमदनगर),७) जिल्हा परिषद पब्लिक स्कुल नेप्ती (अहमदनगर),८) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, धरणगाव (बुलढाणा), ९)जिल्हा परिषद उर्दू शाळा, यशवंत नगर टोणगाव (जळगाव), १0)जिल्हा परिषद विद्या निकेतन देवळा, (नाशिक),११)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडेवाडी (सातारा) १२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवनगर,(पुणे)१३)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाहुली,(पुणे), १४)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोलवाडी,(परभणी) १५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरताडे (रत्नागिरी)
राज्यातील १५ शाळांना स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 5:03 AM