नवी दिल्ली : दिल्लीच्या स्वच्छतेसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी सांगितले. गाजीपूर आणि अन्य भागात क्षेपण भूमीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही गंभीर यांनी स्पष्ट केले.
सीआयआय-सीबीआरआयच्या वतीने आयोजित ‘बिल्डिंग ग्रीन रिअल इस्टेट’ सम्मेलनात गंभीर बोलत होते. ते म्हणाले की, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रानेही स्वच्छतेसाठी अभियान राबवण्याची गरज आहे.
गाजीपूर येथील क्षेपणभूमीची परिस्थिती आणि आसपासच्या भागातील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गंभीर यांनी चिंता व्यक्त केली आहे. गंभीर यांनी याबाबत इंदौरच्या आयुक्तांचीही भेट घेतली. गंभीर म्हणाले की, माझ्या कार्यकाळात गाजीपूर क्षेपणभूमीबाबत निर्णय घेण्यास प्राधान्य देणार आहे. गंभीर यांनी निवडणूक काळात कचºयापासून वीजनिर्मिती, स्वच्छ यमुना या योजनांवर काम करण्याचे आश्वासन दिले होते. वायु प्रदूषणाबाबत ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य असून सरकार अनुदान देऊन त्याला पाठिंबा देत आहे.दिल्लीतील बससंख्या कमी होऊन तीन ते चार हजार राहिली आहे. सार्वजनिक परिवहन प्रणालीला बळकटी देण्याची गरज आहे. कचरा व्यवस्थापनाप्रमाणेत महिला सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला जाणार असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. स्थानिक क्षेत्र विकास निधी योजनेंतर्गत मिळालेले पाच कोटी पुरेसे नाहीत. उद्योगांना पाठींबा देण्यासाठी या रकमेत आणखी वाढ होण्याची गरज गंभीर यांनी व्यक्त केली.